नेत्यांच्या महत्वकाक्षांमध्ये अडकला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच....

  • ब्लॉग्ज
  • नेत्यांच्या महत्वकाक्षांमध्ये अडकला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच....
img

नेत्यांच्या महत्वकाक्षांमध्ये अडकला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच....

इकबाल रेठरेकर:कोल्हापूर

पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांच्या निवड लांबणीवर पडल्या आहेत. महायुती मधील 

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची अध्यक्ष पदाची पाशवी महत्वकांक्षामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा तिढा सुटलेला नाही.. त्यामुळे अध्यक्ष पदाचा प्रश्न अधिक जटिल बनला आहे. 

जिल्हा परिषदेचा, अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता लागून असतानाच, अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळेही अध्यक्ष पदाची निवड लांबणीवर पडल्याच सांगण्यात येत आहे. 

त्यातच अध्यक्षपदाचे कोडे सोडवणारे नेते देखील अधिवेशनात गुंतले आहेत. याशिवाय अध्यक्ष कोण होणार यावरून, कोल्हापूर सांगली आणि सातारा ह्या तिन्ही जिल्ह्यातील  नेत्यांच्या मध्येच अंतर्गत सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे.

जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीनंतर निकालाच चित्र देखील स्पष्ट झाले. त्यामुळे आता साहजिकच अध्यक्षपदाच्या निवडी कडे लक्ष  लागून आहे.

मात्र कोल्हापूर सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अध्यक्षपदावरून राजकीय पेच निर्माण झाले आहेत. 

कोल्हापूरमध्ये महायुतीचे संख्याबळ

अध्यक्षपदासाठी पुरेसे आहे. मात्र महायुती मधील मित्रपक्ष भाजप , शिंदेसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्येच अध्यक्षपदावरून रस्सीखेच सुरू असून, तितकाच अंतर्गत संघर्ष देखील पाहायला मिळत आहे. सर्वाधिक वीस सदस्य असलेल्या राष्ट्रवादीने अध्यक्ष पदासाठी दावा केलाय. तर दुसरीकडे 12 सदस्य असलेल्या भाजपने देखील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर दावा केला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून राजकीय पेच निर्माण झाला आहे.  कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पदावर राष्ट्रवादीने दावा केल्या नंतर,  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपचा अध्यक्ष पदावर आमचा देखील हक्क असल्याचं म्हटलंय. त्यामुळं राष्ट्रवादी आणि भाजपमधील संबंध ताणले गेले आहेत.  राष्ट्रवादी आणि भाजपमधील वादामुळे आता  काँग्रेसच्या पाठिंबावर राष्ट्रवादी 

 जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार की काय अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र ही शक्यता सध्या तरी नाही..

परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीतील मित्र पक्षांमध्येच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून राजकारण सुरू आहे.

2016 मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर शोमीका महाडिक यांच्या रूपाने भाजपकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद आले होते.. दरम्यान 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर, जिल्हा परिषदेतील सत्ता बदलली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन केली . मात्र भाजप ज्या पद्धतीने सांगेल त्याच पद्धतीने आता मंत्री हसन मुश्रीपांना ऐकावं लागत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेवर अध्यक्षपदासाठी मुश्रीपांनी दावा केला असला तरीही अद्याप हे कोडे सुटलेले नाही. त्यामुळे,. कोल्हापूरचे अध्यक्षपदाचे घोडे अडले असतानाच सांगलीत देखील अध्यक्षपदाच्या निवड रखडल्याचे दिसत आहे. 

सांगली जिल्ह्यामध्ये देखील हाच वाद पहायला मिळत आहे. सांगली जिल्हा परिषदेचा, अध्यक्ष कोणाचा होणार याची देखील उत्सुकता लागून आहे. .

सांगली जिल्ह्यामध्ये भाजपकडे पुरेशे संख्याबळ नाही.. महायुतीला, याठिकाणी काठावरचे यश मिळाले आहे. त्यामुळे सांगलीमध्ये भाजपला बाजूला ठेवून अध्यक्ष करण्याच्या हालचाली  सुरू आहेत.

 भाजपचे संख्याबळ १६ असल्याने सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजचा गट स्थापन केला आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बलाबल १८ आहे. आमदार जयंत पाटील यांनी आपला गट स्थापन केला आहे. राज्यात महायुतीची सत्ता असल्याने भाजप १६ आणि शिवसेना ७, जनसुराज्य १, रयत क्रांती शेतकरी संघटना १ असे एकूण २५ सदस्य एकत्रित येण्याची शक्यता आहे.

तर राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे बलाबल ६ आहे. राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी अद्यापही गट स्थापन केला नसल्याने राष्ट्रवादीच्या भूमिकेवरच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरणार असल्याच सांगली मध्ये चित्र आहे.  राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपला गट अद्यापही स्थापन केला नाही. परंतु महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी हालचाली गतिमान असल्या तरी राष्ट्रवादीला अध्यक्षपद द्यावे. असा दावाही जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केल्याने सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा निर्णय लांबणीवर पडला असल्याची चर्चा आहे. त्यातच काँग्रेसने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यास हे संख्याबळ 30 पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे आमदार जयंत पाटील यांच्याकडे आणि पर्यायाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद येऊ शकते. 

दरम्यान सातारा जिल्ह्यात देखील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून अनेक राजकीय खलबते सुरू आहेत. या ठिकाणी भाजपनेच अध्यक्षपदावर दावा केला आहे. तर राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेचे जिल्हा परिषद सदस्य सहलीवर गेले आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये भाजपचे सर्वाधिक सत्तावीस सदस्य आणि एका अपक्ष सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने एकूण 28 सदस्य आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर देखील भाजपने दावा केला आहे. मात्र हा तिढा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चर्चेनंतर सोडवला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

सातारा जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी भाजपचे नेते तथा ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दावा केला आहे.  तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेसेनेचे संख्याबळ जास्त आहे. साताऱ्यामध्ये भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष करायचा म्हटलं तर त्यांना अजूनही सहा सदस्यांची गरज आहे.  सातारा मध्ये  भाजपचे 26 शिंदेसेनेचे 17 आणि राष्ट्रवादीचे 20 जिल्हा परिषद सदस्य विजय झाले आहेत. या ठिकाणी भाजप स्वतंत्ररित्या लढला होता. तर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी यांनी युती करून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला ते सामोरे गेले होते

भाजपचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे यांच्यासह जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, कन्हाड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरोधात सभा घेतल्या. आरोप प्रत्यारोप झाले. त्यामुळे साहजिकच शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी 

यापूर्वीच तीव्र नाराजी व्यक्त केली आहे... त्यामुळे महायुती मधील नेत्यांचे संबंध ताणले गेल्याने सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा वाद देखील सुरू आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून सध्या तरी कोल्हापूर सांगली आणि सातारामध्ये महायुती मधील मित्र पक्षांच्या मध्येच अंतर्गत संघर्ष सुरू आहे. यामुळे एकंदरीत जिल्हा परिषद अध्यक्ष निवड लांबणीवर पडल्याच चित्र आहे. त्यातच हा तिढा सोडवणारे नेते देखील अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्यस्त आहेत. त्यामुळेच सध्यातरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीची प्रतीक्षा लागून आहे.

राज्यात भाजप शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुती म्हणून सत्तेत आहे. मात्र स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद अध्यक्ष निवड करण्यावरून महायुतील मित्र पक्षामधील संबंध मात्र ताणले जात असल्याचे चित्र आहे. 

त्यामध्ये सांगली सातारा आणि कोल्हापूर या जिल्हा परिषदेचा प्रामुख्याने समावेश आहे.

 त्यामुळेच अध्यक्षपदाच्या निवड लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. साताऱ्यामध्ये ज्याप्रकारे भाजपचे नेते मंत्री जयकुमार गोरे अध्यक्षपदावर दावा करत आहेत. त्याच पद्धतीने शिंदेसेनेचे नेते मंत्री शंभूराज देसाई हे देखील अध्यक्षपदासाठी दावा करत आहेत. कोल्हापुरात देखील तीच परिस्थिती आहे. तर सांगलीत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील  यांनी देखील जिल्हा परिषद अध्यक्षपदावर दावा केल्याने,  नेत्यांच्या महत्त्वकांक्षी मुळेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडी सध्या रखडल्याचं चित्र आहे.